डॉ. केशव यशवंत राजपुरे: एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व (आयुष्याच्या यज्ञात साथ देणारे गुरूवर्य, मित्रमंडळी, सहकारी, आप्त आणि असंख्य विद्यार्थी यांना हृदयात स्थान देवून नाती जोपासणारे मायाळू आणि हळवे व्यक्तिमत्व. आपल्याच वाटेने येणाऱ्या आपल्या बांधवांना प्रोत्साहन देणारी प्रेरणा, व एक जिद्दी व्यक्तिमत्व. वडिलांचे ‘यशवंत’ नाव सत्यात उतरवून जीवनात यशवंत झालेले माझे गुरुवर्य डॉ केशव यशवंत राजपुरे सर)
राजपुरे सरांचा जन्म वाई तालुक्यातील बावधन गावच्या एका छोट्याश्या वाडीत; अनपटवाडी येथे दि. २४ जुलै १९७१ रोजी झाला. मूळचे दरेवाडीचे (बावधनचीच दुसरी एक वाडी) असणारे राजपुरे कुटुंबीय जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी अनपटवाडी येथे स्थायिक झाले होते. हलाखीची परिस्थिती, शेती हाच उपजीविकेचा आधार तसेच घरात इतर भावंडं (पाच बहिणी आणि एक भाऊ) असलेले हे कुटुंब पुढे यशस्वी कुटुंब म्हणून नावलौकिक मिळवेल, हे कोणाला स्वप्नातही वाटले नसते. वडील कै यशवंत राजपूरे यांनी पूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी काबाडकष्ट, मजुरी आणि शेतीची उरफोड करणारी कामे करून व्यतीत केले.
अश्या परिस्थितीत अनेक प्रसंगांना सामोरे जात सरांचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. सन १९७७ ते १९८० या काळात सरांचे इयत्ता पहिली ते तिसरीचे प्राथमिक शिक्षण अनपटवाडी या मूळ गावी झाले. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले सर कायम ८५ टक्के च्या वरच असत. सन १९८० साली इयत्ता चौथी साठी सरांचा प्राथमिक शाळा बावधन येथे प्रवेश झाला. नवीन शाळा, शिक्षक आणि वातावरणाचा तेव्हा त्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला. चौथी च्या केंद्र परीक्षेमध्ये सरांना ७४.२५ टक्के गुण मिळाले. सन १९८१ ते १९८७ दरम्यान सरांचे इयत्ता पाचवी ते दहावी चे शिक्षण बावधन हायस्कूल, बावधन येथे पूर्ण झाले. इयत्ता दहावी पर्यंत बावधन पंचक्रोशीत असलेल्या साऱ्या शाळांमधून सर प्रथमच यायचे, त्यांचे गुण ८० टक्क्यांच्या खाली कधीही आले नाहीत. जिद्द, चिकाटी, चौकस बुद्धी आणि अभ्यासू वृत्ती यांच्यामुळे सर १९८७ साली दहावीच्या शालांत परीक्षेत ८० टक्के गुण मिळवून बावधन केंद्रात प्रथम आले.
उच्च माध्यमिक शिक्षण घ्यायचे की कुटुंबासाठी काम करून पैसे कमवायचे या द्विधा मनःस्थितीत सर अडकले होते. खंडाळा येथील सरांचे दाजी स्व. सदाशिव कृष्णा शिर्के यांनी या काळात सरांना आधार दिला. सुट्टीच्या कालावधीमध्ये सर कापड दुकानावर काम करू लागले. शिक्षण चालू राहावे म्हणून खंडाळ्याच्या राजेंद्र विद्यालयामध्ये अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. तद्नंतर त्याचवर्षी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे सिव्हील डिप्लोमा साठी सरांना प्रवेश मिळाला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरांना नाईलाजाने कराड येथील डिप्लोमाचा प्रवेश रद्द करावा लागला. मग त्यांनी वाईच्या किसनवीर महाविद्यालयामध्ये सप्टेंबर १९८७ मध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. सरांनी सन १९८९ साली फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांच्या ग्रुप मध्ये ८६ टक्के गुण मिळवले तसेच बारावी शास्त्र शाखेत एकूण ८२ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात दुसरा येण्याचा बहुमान मिळवला.
सरांनी डिप्लोमाचा प्रवेश रद्द केल्याचा मनातील रोष बाजूला ठेवून दाजींनी मोठ्या मनाने त्यांच्या बारावी नंतरच्या पुढील शिक्षणाचा बोजा परत एकदा उचलण्याची तयारी दर्शवली. मग लोणंद येथील सायन्स कॉलेजमध्ये बी. एससी. साठी सरांनी प्रवेश घेतला. सर यावेळी त्यांच्या खंडाळ्याच्या दाजींच्या येथे राहायला होते. बारावी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवणारा विद्यार्थी इतरत्र कोठेही प्रवेश न घेता आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेतो याची दखल महाविद्यालयाचे प्राचार्य कै. दिपा महानवर यांनी घेतली. सरांच्या गुणवत्तेला त्यामुळे वाव मिळाला. सन १९९२ साली बी. एससी. मध्ये शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रामधून (सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर) प्रथम येण्याचा बहुमान सरांनी मिळवला होता. बी. एससी. च्या तिन्ही वर्षांत ९१ टक्के गुण मिळवून सरांनी बाजी मारली होती.
सन १९९२ साली बी. एससी. त ९१ टक्के गुण प्राप्त केल्यानंतर महानवर सरांचे मार्गदर्शन घेऊन सरांनी एम.एससी. करायचे ठरवले. सरांचे पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झाले. त्यातही ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. सन १९९४ साली एम.एससी. च्या परीक्षेत सरांनी भौतिकशास्त्र विषयांत ६६ टक्के गुण मिळवून 'श्रीमती गंगुबाई दत्तात्रय कुलकर्णी (जांभळीकर), इचलकरंजी पुरस्कार' मिळवला. पुढे संशोधनाची आवड निर्माण झाल्यामुळे सरांनी नोकरीशोध थांबवून प्रा. ए. व्ही. राव सरांकडे ऑक्टोबर १९९४ साली युजिसी संशोधन प्रकल्पामध्ये प्रोजेक्ट फेलो म्हणून काम सुरू केले. तब्बल एक वर्ष आणि आठ महिने या ठिकाणी काम केल्यानंतर सुध्दा काही तांत्रिक अडचणींमुळे ते राव सरांकडे पी.एच.डी. करू शकले नाहीत. दरम्यान ३१ डिसेंबर १९९५ साली सरांच्या वडिलांचे निधन झाले.
पुढे जून १९९६ साली सर डॉ. सी.एच. भोसले यांच्याकडील डी.एस.टी. संशोधन प्रकल्पामध्ये पुन्हा नव्या जोमाने आणि उमेदीने रुजू झाले. हे करत असतानाच ज्युनिअर रिसर्च फेलो म्हणून दोन वर्ष आणि सिनियर रिसर्च फेलो म्हणून एक वर्ष संशोधन कार्य केले. जुलै १९९९ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये अधिव्याख्याता पदावर सरांची निवड झाली. सरांना दर्जेदार आणि ज्ञानात्मक अध्यापन क्षमता प्राप्त झाली आहे. सरांच्या 'सेप्टम विद्युत घट' यावरील शोध प्रबांधासाठी शिवाजी विद्यापीठाने भौतिकशास्त्र विषयातील पी.एच.डी. (विद्यावाचस्पती) ही पदवी मे २००० मध्ये बहाल केली. या संशोधनासाठी सरांना डॉ. सी.एच.भोसले सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. पुढे महाराष्ट्र राज्य शासन आयोजीत व पुणे विद्यापीठामार्फत फेब्रुवारी २००२ मध्ये घेण्यात आलेल्या भौतिकीय विज्ञान विषयातील अधिव्याख्याता पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता चाचणी (एसइटी) - सेट पात्रता परीक्षा सर उत्तीर्ण झाले. आपल्या कर्तृत्वामुळे सर २०११ साली सर भौतिकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक झाले. २०१४ साली सरांची सरळ सेवा भरतीद्वारे प्राध्यापक पदी नियुक्ती झाली.
आत्तापर्यंत सरांचे एकूण २०० शोध निबंध वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये दोन समीक्षा शोध निबंधांचा देखील समावेश आहे. त्यांच्या 'पाणी शुद्धीकरणा' संबंधित वैशिष्ठ्यपूर्ण संशोधनावरील त्यांनी दोन पेटंटस नोंदवली आहेत. आत्तापर्यंत त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा विद्यार्थ्यांनी पी.एच.डी. पदवी संपादन केलेली आहे आणि सध्या सहा विद्यार्थी त्यांच्याकडून पी.एच.डी. साठी मार्गदर्शन घेत आहेत. सरांनी केंद्र सरकारच्या निधीतील जवळजवळ ८६ लाख अनुदानाचे पाच संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स ने सरांना कायमचे सदस्यत्व बहाल करून त्यांच्या महान कार्याचा यथोचित सन्मान केला आहे. सरांचा संशोधनातील एच-इंडेक्स ५० आहे तर त्यांच्या संशोधनास ७१७४ सायटेशन्स अर्थात उद्धरणे मिळाली आहेत. शिवाजी विद्यापीठाने जून २०१६ पासून त्यांच्यावर यूसिक, सीएफसी आणि डीएसटी-सैफ या विद्यापीठाच्या सुविधा केंद्रांच्या विभागप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. सर बऱ्याच संशोधन मासिकांचे तसेच विद्यापीठांतील पी.एच.डी. साठी चे परिक्षक आहेत. प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षक यांच्या नेमणूका करण्यासाठी कुलगुरू नियुक्त प्रतिनिधी म्हणून ते काम पाहतात. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर सर प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. ते विविध महाविद्यालयांच्याही अभ्यासमंडळांचे सदस्य आहेत. विद्यापीठाच्या लोकल इन्कवायरी कमिटी (एल.आय.सी.) तसेच टेक्निकल कमिटी अश्या विविध समित्यांवर सरांच्या कार्याची छाप आहे.
जरी त्यांनी पीएचडी आणि सुवर्ण पदक जिंकले होते तरी प्राध्यापक म्हणून कायमपद मिळविण्यासाठी त्यांना पात्रता चाचणी ची अर्हता प्राप्त करावी लागणार होती. पुढे ते विद्यापीठ अनुदान आयोगाने ठरवून दिलेल्या महाराष्ट्र राज्य शासन आयोजीत व पुणे विद्यापीठामार्फत फेब्रुवारी २००२ मध्ये घेण्यात आलेल्या 'आधिव्याख्याता पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता चाचणी' -सेट परीक्षा पास झाले. उल्लेखनीय मुद्दा म्हणजे त्यांनी या परीक्षेसाठी कधीही विशेष अभ्यास केला नाही. विशेषतः विभागामध्ये तेंव्हा नव्याने सुरु झालेल्या एम.एस्सी. भाग एक च्या सेमिनार एक्टीव्हिटी ला ते या यशाचे श्रेय देतात. भौतीकशास्त्रातून पात्रता चाचणी (एसइटी) परीक्षा उत्तीर्ण होणे हीच मुळी आव्हानात्मक गोष्ट आहे की जिचा निकाल तेव्हा १ टक्क्याहून कमी लागला होता. हे ते करू शकले ते निव्वळ त्यांच्यात निर्माण झालेल्या आत्मविश्वास, जिद्द आणि निश्चयी स्वभावामुळे ! अजूनही या विषयातून ही चाचणी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतपत आहे.
सध्या डॉ. राजपूरे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विषयात प्राध्यापक या पदावर काम करत आहेत. जुन १९९९ पासून ते विभागातील 'शिक्षकांचे सचिव' म्हणून काम पाहत आहेत. त्यांची शिस्त-प्रिय तसेच विद्यार्थी-प्रिय शिक्षक म्हणूनही ख्याती आहे. विभागातील अभ्यासक्रमाचे नुतनीकरण असो, विद्यार्थ्यांचे श्रमदान असो, सेमिनार एक्टीव्हिटी असो किंवा न्याक मुल्यांकन समिती असो, त्यांचा उत्स्फुर्त सहभाग हा ठरलेलाच. कोणत्याही कार्यक्रमांचे सुसुत्र पद्धतीने नियोजन आणि आयोजन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
आत्तापर्यंत त्यांचे एकूण १८५ शोध निबंध वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये एका रिव्हिव्ह आर्टीकल चा देखील समावेश होतो. त्यांच्या 'पाणि शुद्धिकरणा' संबंधित वैशिष्ठपुर्ण संशोधनावरील त्यांनी दोन पेटंटस नोंदवली आहेत. आत्तापर्यंत त्यांची पाच पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बारा विद्यार्थ्यांनी पीएच. डी. पदवी संपादन केलेली आहे व आणखी दोघेजण पीएच. डी. साठी सध्या मार्गदर्शन घेत आहेत. यातील काही विद्यार्थी पुढे दक्षिण कोरिया येथे उच्च शिक्षण घेत आहेत, तसेच इतर पुणे विद्यापीठ, विद्या प्रतिष्ठान, बारामती, दत्ताजीराव कदम कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, इचलकरंजी तसेच शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे सहाय्यक प्राध्यापक पदी काम करीत आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या निधीतील पाच प्रकल्प यशस्वीरित्या पुर्ण केले आहेत. या अनुदानातून त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत छान संशोधन सुविधांची निर्मिती करुन विभागाच्या पायाभूत संशोधन सुविधे मध्ये भर घातली आहे. त्यांनी भौतिकशास्त्र विभागातील संशोधन सुविधा केंद्र विकसित करण्यास मदत केली आहे. ब-याच संशोधन मासिकांचे तसेच विद्यापीठांतील पीएच. डी. साठी ते परिक्षक आहेत.
अध्यापन आणि संशोधन याबरोबरच सरांनी सामाजिक कार्याचीदेखील आवड जोपासली आहे. मुंबईस्थित श्री. ग्राम विकास मंडळ, अनपटवाडी या सेवाभावी संस्थेचे ते सभासद आहेत. हि संस्था आवश्यक कौशल्य आणि आर्थिक मदत देऊन गावाच्या विकासासाठी समर्पित आहे. शहीद परिवारासाठी कार्य करणाऱ्या 'जयहिंद फाऊंडेशन' या सामाजिक संस्थेचे ते संचालक आहेत.
सर आपल्या संशोधनाचा आलेख उंचावत राहो. आपणास निरोगी, आनंदी, चैतन्यदायी आणि सुखकारक आयुष्य लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.
शब्दांकन - अनिकेत भोसले
मोबाइल - 8975711080