अल्प परिचय

डॉ. केशव यशवंत राजपुरे हे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातले सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आहेत. शिक्षणाबद्दल प्रचंड रुची असलेले एक अप्रतिम संशोधक म्हणून डॉ. राजपुरे यांचा प्रभावी पेपर पब्लिकेशन बाबत इतिहास आहे आणि त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत. त्यांची समर्पणाची भावना विद्यापीठिय वलयापलीकडेही आहे. ते विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विविध पातळ्यांवर कार्यरत असून प्रतिष्ठित डेटाबेसमध्ये योगदान देतात.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन जवळच्या अनपटवाडी येथे २४ जुलै १९७१ रोजी डॉ. केशव यशवंत राजपुरे यांचा जन्म झाला. शाळेपासूनच प्रथम क्रमांक मिळवत आलेले डॉ. राजपुरे यांनी लोणंदच्या शरदचंद्र पवार महाविद्यालयातून १९९२ मध्ये शिवाजी विद्यापीठातून बीएस्सी फिजिक्स प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन प्रथम क्रमांक पटकावला. यासाठी त्यांना प्रा. शिर्के पुरस्कार, वारंगे पारितोषिक आणि स्वामी शिष्यवृत्ती मिळाली. १९९४ मध्ये एमएस्सी फिजिक्सही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन त्यांना कुलकर्णी जांभळीकर पुरस्काराने गौरवण्यात आले. आज ते शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात कार्यरत आहेत.

अशा उज्ज्वल शैक्षणिक कारकिर्दीनंतरही डॉ. राजपुरे यांना संशोधनाचीच अधिक आवड निर्माण झाली. जुनिअर व सिनियर रिसर्च फेलोशिप द्वारे त्यांनी प्रा. चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सौर ऊर्जा क्षेत्रात संशोधन करून २००० साली पीएचडी पदवी प्राप्त केली. त्यांच्या या उल्लेखनीय संशोधनाबद्दल पुण्याच्या महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्सने त्यांचा गौरव केला. त्यानंतर ते कोल्हापुरात स्थायिक होऊन संशोधन कार्य सुरूच ठेवत आहेत. थीन फिल्म्स, सोलर सेल्स, ट्रान्स्परन्ट कंडकक्टिव्ह ऑक्साईड, फोटोइलेक्ट्रोकेमिस्ट्री, गॅस सेन्सर, पाणी शुद्धीकरण ही त्यांच्या संशोधनाची प्रमुख क्षेत्रे आहेत.

डॉ. राजपुरे यांच्या रिएटवेल्ड विश्लेषणातील अपवादात्मक प्रवीणतेमुळे एक उल्लेखनीय कामगिरी झाली आहे. त्यांचे दहा एक्सआरडी नमुने आयसीडीडी डेटाबेसमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. हे त्यांच्या क्रिस्टलोग्राफीवरील प्रभुत्व आणि या क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे प्रमाण संशोधनातील उत्कृष्ट योगदानामुळे डॉ. राजपुरे यांचे नाव गेल्या चार वर्षांपासून (२०२०, २०२१, २०२२, २०२३) जगभरातील सर्वाधिक संदर्भित संशोधकांच्या शीर्ष २% संशोधकांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. एकूण एक लाख संशोधकांच्या यादीत केवळ १५०० भारतीय संशोधक असल्याने ही एक अप्रतिम उपलब्धी आहे. यामुळे जागतिक आव्हानांना सामोरे जाणाऱ्या त्यांच्या उच्च दर्जाच्या संशोधनाचे दर्शन घडते.

या संशोधनासंदर्भात सरांचे आजपर्यंत २०० शोधिनबंध विविध आंतरराष्ट्रीय नियतकालीकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यासाठी त्यांना ११३६१ सायटेशंस मिळाली आहेत. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत / सेमिनारमध्ये त्यांचे सुमारे १५० शोधिनबंध सादरीकरणे झाली आहेत. एम.एस्सी. च्या ७५ पेक्षा जास्त प्रोजेक्ट्सना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. आजपर्यंत ३८ राष्ट्रीय व २५ आतंरराष्ट्रीय परिषदांमधील सहभागासह दोन परिषदांचे आयोजन सरांनी केले आहे. केंद्र सरकारचे जवळ जवळ ९० लाख रुपयांचे अनुदान मिळवून ५ संशोधन प्रकल्प सरांनी पूर्ण केले आहेत. पाणी शुद्धीकरणावरील दोन पेटंट सरांच्या नावे आहेत. सरांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत २० जणांनी पिएचडी पूर्ण केली आहे तर सध्या ८ जण काम करत आहेत.

या दरम्यान विद्यापीठात विविध संशोधन सुविधांच्या निर्मितीत सरांनी सहभाग घेतला. विभागातील पिआयएफसी (फिजिक्स इंस्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी सेन्टर) हे त्याचेच उदाहरण आहे. त्याच बरोबर त्यांनी विद्यापीठाच्या युसिक (युनिव्हर्सिटी सायन्स इंस्ट्रुमेंटेशन सेंटर)) व सीएफसी (कॉमन फॅसिलिटी सेंटर) विभागांचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पडली आहे. तसेच त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या सोफ्टिस्टिक एनालिटिकल इन्स्ट्रुमेंट सुविधा (एसएआयएफ) केंद्राचे समन्वयक आणि शिवाजी विद्यापीठ (विज्ञान आणि तंत्रज्ञान) जर्नलचे व्यवस्थापकीय संपादक म्हणून काम पहिले आहे.

ते शिवाजी विद्यापीठ, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर आणि डीकेटीई संस्थान, इचलकरंजी च्या अभ्यास मंडळांचे सदस्य आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधन आणि मान्यता समितीचे ते सदस्य आहेत. ते स्थानिक चौकशी समिती (संलग्नता), विद्यापीठाची तांत्रिक समिती आणि खरेदी समितीचे सदस्य आहेत. ते शिक्षक आणि प्राचार्यांच्या निवड समित्यांसाठी कुलगुरूचे नामनिर्देशित सदस्य आहेत. त्यांची ५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सर अनेक विद्यापीठांच्या पीएचडी साठीचे रेफरी म्हणून काम पाहत आहेत.

ते मराठी विज्ञान परिषद, मटेरीयल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया (एमआरएसआय), सेमीकंडक्टर सोसायटी ऑफ इंडिया (एसएसआय), इंडियन फिजिक्स असोसिएशन (आयपीए) आणि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स (आयएपीटी) या संस्थांचे आजीवन सभासद आहेत. विविध संशोधन पत्रिकांच्या संपादक मंडळावरही ते कार्यरत आहेत. १९९२ मध्ये ते शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाचे सदस्य होते.

उच्च पदावर असूनही, ते नेहमी पाय जमिनीवर ठेवून, सामाजिक कामात सक्रिय सहभागी असतात.